Sunday, June 04, 2006

Another Sketch
Horese riding...

काळजाला एवढे नादावणारे

काळजाला एवढे नादावणारे,
कोण आहे सारखे बोलावणारे?

वादळांनो दार का लोटून घेता?
यायचे कोणीतरी ठोठावणारे!

मी सुखाला भेटलो नाही कधीही
भेटलेले दु:खही वेडावणारे

पाहिले जेरीस येणे उत्तरांचे
(प्रश्नही होते तसे भांबावणारे!)

होय वेडे,मीच तो प्राजक्त आहे
वेगळे नाही कुणी डोकावणारे!

कोंब स्वप्नांचे नव्याने येत गेले
रिक्त डोळे व्हायचे ओलावणारे

काय? कोऱ्या कागदांनी बंड केले?
(शब्द मागे लागले भंडावणारे)

नाव माझे टाकले मी, काय झाले?
कोण होते नाव मोठे लावणारे?

पेटणारी लाकडे होती इमानी
रक्त कैसे आमचे थंडावणारे?

पाऊसदेखील...!

पाऊसदेखील...!( वृत्त- मंदाक्रांता)

वर्षाधारा सजल तुजला काय सांगून गेल्या?
डोळ्यांमध्ये सकल तुझिया भावना दाटलेल्या

मी ही कोणी, विफल तव ते भाव, वेचून घेतो
याची डोळा, विरह उपरा, त्याक्षणी मी पहातो

संध्याकाळी सहज श्रवते बासरी दंग वेळी
मी वाऱ्याच्या जवळ, अपुल्या गुंफितो धुंद ओळी

ताना घेऊ, अवखळ सखे, मी इथे थांबलेलो
तूही यावे, मधुर वदनी, ज्यास मी भाळलेलो

नाही तू गे, भिजत म्हणुनी 'हंस' नाराज झाला
प्रेमामध्ये भिजत थिजुनी रंग त्याचा उडाला...

-(नील!)हंस.

पावसास...

पावसास...
फ़िरतील वारे, देत इशारे
झुलतील सागर , कनक किनारे
झुकतील शिखरे , तुटतील तारे
मंद शांत होतील निखारे
उडती पाखरे , धुके लाजरे
दवबिंदू ओघळे आहा रे!
देशील का मज फुल साजरे?
बघ ते भृंगही किती नाचरे
तोय पाझरे शांत न च झरे
हर्षोत्त्फुल्ल हालती मृगतुरे
हे जलधारे फुलव धुमारे
एकजीव कर नवरस सारे
भिजती आस रे, भिजव आसरे
जलदांनो नभ दुमदुमवारे
जलद फवारे, अंगी शहारे
मनी दाटती भाव हे न्यारे
मृद्गंध ऊरे, मनी मम भरे
थेंब झेलुनी गाऊ सुस्वरे
सखे सोयरे हेच ते रे
न च अश्रुंचे थेंब टपोरे
मंद हासरे, प्रसन्न सारे
सुर सतारीवर दीड दा रे
दुःख बोचरे सरावयारे
ओलावा तू देत रहा रे
असाच अजुनी येत रहा रे
मला पावसा भेटत जा रे!

-नीलहंस.

Saturday, April 22, 2006

मी उगाच चौकशी करायचो कधीतरी

मी उगाच चौकशी करायचो कधीतरी

मी उगाच चौकशी करायचो कधीतरी
मी मलाच पत्र पाठवायचो कधीतरी!

भेटणार श्वास वादळास हे कळूनही
घ्यायचो, उरात साठवायचो कधीतरी

आरश्यासमोरही रडायचो जपून मी
एकटा असूनही फसायचो कधीतरी

गोड मानला तुझा नकारही बळे बळे!
आठवून फक्त ते हसायचो कधीतरी

आसपास खिन्न भूतकाळ येत राहिला
त्यात मी चुकून वावरायचो कधीतरी

फावल्या क्षणांत मी किती खुशीत यायचो!
प्यायचो कधीतरी , जगायचो कधीतरी

बोललो बरेच मी, अजून काय राहिले?
हो! अखेर बोललो; कण्हायचो कधीतरी

-नीलहंस